INDIA NEWS

Press

“एका हातात विक्रम, दुसऱ्या हातात मृत्यू? अकोल्यातील डॉक्टरांवर दुहेरी वास्तवाचा प्रश्न”

abhijit Solanke 30 march 2026

अकोल्यात एकाच वेळी समोर आलेल्या दोन धक्कादायक घटनांनी खाजगी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एका बाजूला ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. मुकेश राठी यांनी ३२ वर्षीय महिलेवर तब्बल साडे सोळा किलोची गाठ काढून गर्भाशय सुरक्षित ठेवत अभूतपूर्व शस्त्रक्रिया करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले; तर दुसऱ्या बाजूला डॉ. तरुण राठी (सिद्धिविनायक हॉस्पिटल, अकोला) यांच्या कथित निष्काळजीपणामुळे सौ. रूपाली कविटकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.
डॉ. मुकेश राठी यांच्या नेतृत्वाखालील टीमने केलेली शस्त्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात कौतुकास्पद मानली जात आहे. 34.8 व 29.5×20 सेमी आकाराची प्रचंड गाठ काढतानाही रुग्णाचे गर्भाशय सुरक्षित ठेवणे ही दुर्मिळ कामगिरी ठरली. या यशामुळे अकोल्याचे नाव उजळले असले तरी, याच शहरात दुसऱ्या घटनेने आरोग्य व्यवस्थेचे काळे वास्तव उघडे पाडले आहे.

सौ. रूपाली कविटकर मृत्यू प्रकरणात मात्र चित्र पूर्णतः उलट आहे. तक्रारदारांच्या मते, ऑपरेशनपूर्वी आवश्यक तपासणी, शुगर नियंत्रण, ICU व ऑक्सिजन सुविधा यांचा अभाव होता. त्यानंतर रुग्णाची प्रकृती बिघडत गेली आणि शेवटी तिचा मृत्यू झाला. AIIMS नागपूरच्या अहवालात ‘Hypoxic Ischemic Encephalopathy’ म्हणजेच मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेली गंभीर इजा स्पष्टपणे नमूद असल्याने निष्काळजीपणाच्या आरोपांना अधिक बळ मिळत आहे.
एकीकडे “जीवन वाचवणारे विक्रम”, तर दुसरीकडे “जीवन गमावणारे उपचार” — या विरोधाभासाने अकोल्यातील खाजगी रुग्णालयांची कार्यपद्धतीच संशयाच्या केंद्रस्थानी आणली आहे. प्रश्न उपस्थित होतो —
“काही डॉक्टर देवदूत, तर काहींच्या हातून रुग्णांचा बळी का?”
“यशस्वी शस्त्रक्रियांमागील कौतुक आणि अपयशामागील जबाबदारी ठरवणार कोण?”

दरम्यान, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन, अकोला यांची भूमिका देखील वादात सापडली आहे. गंभीर वैद्यकीय तफावत, कुटुंबीयांचे आरोप आणि मृत्यूची नोंद असूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संताप वाढत आहे.
अकोल्यात सध्या एकच चर्चा “विक्रम साजरे करायचे की मृत्यूंची चौकशी?”आता या प्रकरणात प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेतात, यावरच नागरिकांचा विश्वास टिकणार की ढासळणार, हे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish